मुंबई : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. काल भाजपाने ९९ जागांची घोषणा केली. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. पवार यांनी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडू आज सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती येथे प्रचारासाठी गाड्याही सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती, अखेर काल जागावाटप पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल भाजपाने पहिली यादी जाहीर केली, या यादीत ९९ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्या शिंदे गटाची यादी जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि वाळवा विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात भाजपातील नेत्यांना घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे बोलले जात आहे. वाळवा मतदारसंघात भाजपाच्या निशिकांत पाटील यांना तर तासगाव विधानसभेतून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना घड्याळ चिन्हावर उतरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
कोणाला मिळाले एबी फॉर्म?
छगन भुजबळ, अतुल बेनके, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, दौलत दरोडा, राजेश पाटील, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, भरत गावित, बाबासाहेब पाटील.