23.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप ; लंकेंच्या पत्नीसह ३ जणांनी घेतला अर्ज

शरद पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप ; लंकेंच्या पत्नीसह ३ जणांनी घेतला अर्ज

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरीकडे अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे उमेदवारांच्या रांगा पक्षाच्या नेत्यांकडे लागल्या आहेत. त्यातच, आज महाविकास आघाडीची नावे जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एबी फॉर्म घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणी लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईतून घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मतदारसंघात प्रचारासाठी उमेदवारांना तत्काळ कामाला लागता यावं, यासाठी पक्षाकडून तत्काळ एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती आहे.

तर, शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून एबी फॉर्म द्यायला सुरवात झाली असून ज्या जागावर तिढा नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. राजापूर लांजा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीमधून एबी फॉर्म स्वीकारला. तसेच, कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांचा देखील एबी फॉर्म प्रतिनिधीने स्वीकारला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इस्लामपूरमधून जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून रिंगणात असतील. काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, घनसावंगी राजेश टोपे, तर मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड असतील. कवठे महाकाळमधून स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, सिंदखेडराजामधून राजेंद्र शिंगणे, राहुरीमधून प्राजक्ता तनपुरे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, कागलमधून समरजितसिंह घाटगे, इचलकरंजीमधून मदन कारंडे आणि चंदगडमधून डॉ. नंदिनी बाभुळकर यांचा संभाव्य उमेदवारांच्या यादीत समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR