23.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeपरभणीदुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है......!

दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है……!

अनवर शेख
पाथरी : सख्खे भाऊ पक्के वैरी अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. परंतु महायुतीतील सख्खे मित्र पक्के वैरी ही बाब प्रथमच पाथरी विधानसभेत पाहायला मिळत आहे. सत्ता आणि संपत्तीमुळे कटूता यायला वेळ लागत नाही. कालपर्यंत एकमेकांना आमदार करण्यासाठी धडपडणारे विधान परिषद सदस्य आ. राजेश विटेकर व शिवसेना नेते सईद खान हे दोन्ही नेते महायुतीचा भाग असूनही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. यामुळे दोघांमध्ये राजकीय ठिणगी पडली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मित्राची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल सईद खान यांनी राजेश विटेकर यांचा जंगी सत्कार करत पाथरीतील आपल्या कट्टर विरोधकाचा दुश्मन आपला दोस्त याप्रमाणे चांगलेच डोक्यावर घेतले होते. या भव्य सत्काराने भारावून जात आ. विटेकर यांनीही त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मी विधान परिषदेचा आमदार झालो आता सईद खान यांना विधानसभेत पाठवतो अशा वलग्ना केल्या होत्या. परंतू याचा विसर बहुतेक आ. विटेकरांना पडला असल्याचे सध्या दिसून येत आहे.

जिल्हा नियोजन समिती निधीमुळे झालेले वितुष्ट व अभी नही तो कभी नही या राजकीय ऊक्तीप्रमाणे या दोन्ही नेत्यांना विधानसभेत जाण्याची महत्त्वकांक्षा उफाळून आल्याने विधानसभा तिकिटासाठी दोन्हींनी चंग बांधला होता. इकडे सईद खान जरी मनाने काम घेत होते मात्र तिकडे आ. विटेकर यांनी आपल्या डोक्याने काम घेत स्वत:ला विधानसभेचे तिकीट आणल्याने सईद खान यांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है असे म्हणण्याची वेळच सईद खान यांच्यावर येऊन ठेपली आहे असे म्हणावे लागेल.

तिकडे मात्र काँग्रेसचे आमदार सुरेशराव वरपुडकर यांना प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून आ. विटेकर यांच्या रूपाने मराठा उमेदवार आल्याने सलत असले तरीही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ. बाबाजानी दुर्राणी यांना मात्र शिवसेना नेते सईद खान यांचे तिकीट कटल्याने चांगल्याच गुदगुल्या होत असतील हे देखील तेवढेच खरे. असे असले तरीही महाविकास आघाडी आणि महायुती मधील आपापल्या पक्षातीलच विरोधकाचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याचे घोडा मैदान समोरच असल्याने आगे आगे देख होता है क्या असेच शेवटी म्हणावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR