21 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeलातूर४६ वर्षात एकाही पक्षाने लढविल्या नाहीत २८८ जागा!

४६ वर्षात एकाही पक्षाने लढविल्या नाहीत २८८ जागा!

लातूर : निवडणूक डेस्क
राज्यात १४५ नोंदणीकृत पक्ष आणि ६ राष्ट्रीय आणि ४ राज्यस्तरीय पक्ष असतानाही गेल्या २४ वर्षात कुठल्याही पक्षाने २८८ जागा लढविलेल्या नाहीत. सर्वात सक्षम असलेल्या काँग्रेसने १९७८ पासून कधीच २८८ जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. तोच किस्सा अन्य पक्षांनीही गिरविल्याचे दिसून येते.

या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आप, सीपीआय (एम), बीएसपी नॅशनल पीपल पार्टी (एनपीपी) या राष्ट्रीय पक्षाचा आणि मनसे, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पाच राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे देशभरात २ हजार ७६३ नोंदणीकृत पक्ष असून ६ राष्ट्रीय पक्ष आणि ५८ राज्यस्तरीय पक्षांची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे.

राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात ९ कोटी ६३ लाख मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि ४ कोटी ६६ लाख स्त्री मतदार आहेत. १ लाख १८६ मतदान केंद्र असून त्यामध्ये सर्वाधिक ५७ हजार ५८२ मतदान केंद्र हे ग्रामीण भागात आहेत. ४२ हजार ६०४ मतदार हे शहरी भागातील आहेत.

तब्बल १ कोटी ५५ लाख तरुण मतदार २० ते २९ वयोगटातील असून २० लाख ९३ हजार मतदार हे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र राज्यातील एकही राजकीय पक्ष असा नाही जो सर्वच्या सर्व २८८ विधानसभेच्या जागा लढवित आहे. सत्तेसाठी बनलेल्या आघाड्या व युती तसेच पराभूत होण्याच्या भीतीने एकाही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाने २८८ जागांवर निवडणूक लढविण्याचे धारिष्ट्य दाखविलेले नाही. काँग्रेसने १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २८७ जागा लढविल्या होत्या. १९९० मध्ये २७६ जागा लढविल्या.

आघाड्या आणि युतीमुळे घोळ
आणीबाणीनंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २५९ जागा तर जनता पार्टीने २१५ जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये सर्वाधिक २२३ जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजप आणि शिवसेनेने देखील कधीच दोनशेचा आकडा पार केलेला नाही. स्वबळाचा नारा देणा-या मनसेने २०१४ मध्ये सर्वाधिक २१९ जागांवर उमेदवार उभे केले होते. एकंदरीत आघाड्या आणि युतीमुळे गेल्या ४६ वर्षांपासून एकाही पक्षाने २८८ जागा लढविलेल्या नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR