पुणे : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा विश्वास महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व प्रमुख नेते आणि पदाधिका-यांनी व्यक्त केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली.
दरम्यान, जिल्ह्यातील उमेदवार जाहीर करण्याबरोबर निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीने आघाडी घेतली असल्याचे दिसते आहे. महायुतीच्या घटक पक्षाची नियोजनाची बैठक पुण्यात झाली आणि त्यामध्ये राज्यात महायुतीचे शासन सत्तेवर आणण्यासाठी निर्धार करण्यात आला.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार. राहुल कुल, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिवसेनेचे किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप गारटकर, यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.