देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यात यंदा खरीप हंगामात वेळेवर पेरणी झाली होती.शेतशिवारात पिकेही जोमदार आली होती पण परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्प्यात करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातूनही शेतक-यांनी महागडी औषध फवारणी करूनही सोयाबीन काढणीच्या वेळी निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजाच्या पदरी निराशाच पडली आहे. सोयाबीन पिकांचा सर्व खर्च पाहता त्यांचे उत्पादन खर्चही निघत नाही.
बाजारात योग्य भाव मिळत नाही.रोजच पावसाच्या हजेरीने सोयाबीन पिक काढणीचा खोळंबा होतो. जवळपास काढणी पूर्ण होत आली आहे. शेतकरी शासकीय मदतीची अपेक्षा करीत आहेत. यंदाच्या नुकसान भरपाईचे अर्ज भरणे सुरू असून मदत सणासुदीच्या काळात शेतक-यांना मिळणार का खरा प्रश्न पडत आहे. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन अपेक्षित मिळाले नाही. त्यामुळे ऊस, रब्बी ज्वारी, गहू, हरबरा, मका, कोथिबीर, करडी, सूर्यफुल आदी पिकांचे चांगले -उत्पादन घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. परतीच्या पावसाने शेतशिवारात तणांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी तणनाशके फवारणी करावी लागत असून आधीच शेतातील कामांसाठी मजूर मिळत नाहीत.
पर्याय म्हणून शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत. देवणी परिसरातून मांजरा नदी वाहते. मांजरा नदीवरील धनेगाव उच्चस्तरीय बराजमुळे नदीपात्रात पाणी साठा उपलब्ध असून शेतकरी ऊस लागवड करण्यांच्या तयारीला लागले आहेत. जागृती शुगर कारखान्याने ऊसाचे बेणे उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी त्याचीही पाहणी करीत कोणत्या जातीचे ऊसाचे बेणे, खते आदीच्या शोधात आहेत फक्त परतीचा पाऊस किती दिवस राहतो यावर शेतक-यांची भीस्त असणार आहे.