25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रदहा वर्षांत निवडणूक खर्च दुपटीवर

दहा वर्षांत निवडणूक खर्च दुपटीवर

चहा, जेवणही महाग उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाख

नागपूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाख करण्यात आली आहे. सभा, रॅली, जाहिराती यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो.

दरम्यान, दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये ७५ रुपयांत मिळणारे जेवण आता ११२ रुपयांचे झाले आहे. मांसाहारी जेवण २२४ रुपयांत आणि चहा ८ रुपयांत मिळणार आहे. १० रुपयांची कॉफी साडेतेरा रुपयांत मिळेल. येणा-या विधानसभा निवडणुकीसाठी याच दरानुसार खर्चाचा हिशेब ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून हे दर निश्चित केले जातात.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणा-या सर्व उमेदवारांच्या खर्चाबाबतचे तपशील काटेकोरपणे तपासले जातात. यासाठी खर्चविषयक निवडणूक निरीक्षकाची नेमणूक केली जाते. उमेदवारांच्या प्रचार प्रसिद्धी, जाहीर सभा आदींच्या खर्चाबाबतचा दैनंदिन अहवाल मागविला जातो. २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने २८ लाखांची मर्यादा आखून दिली होती. यात आता १२ लाखांनी वाढ करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या चमूंकडूनही खर्चावर देखरेख ठेवली जाते.

प्रचार साहित्यात वाढ
२०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा इतर साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. वाहन चालकाला दिवसाला ४५० रुपयांऐवजी ५०४ रुपये देण्यात येईल. गांधी टोपी ४.८० रुपयांऐवजी ५.३७ रुपयांत मिळेल. ढोल-ताशे दिवसाला २,४०० रुपयांऐवजी २,६८८ रुपयांत बुक करावे लागतील. ट्रकच्या भाड्यासाठी ५ हजार ५०० ऐवजी ५ हजार ६०० रुपये मोजावे लागतील. कारचे दरही २,७५० ऐवजी २,८०० रुपये, दुचाकीचे भाडे १९८ ऐवजी २०१.६ रुपये आणि सायकलचे भाडे ६६ ऐवजी ६७.२ रुपये झाले आहे.

निर्धारित केलेले दर कमी
खादीच्या गांधी टोपीचे बाजारातील दर प्रति ४० रुपयेप्रमाणे आहेत. पॉलिस्टरची टोपी १० ते १२ रुपयांत मिळेल. बाजारात साध्या जेवणाचे दर १५० ते २०० रुपये थाली आहे. मांसाहार असेल तर २५० ते ३०० रुपये आहे. नाश्ता ३० ते ५० रुपयांत मिळतो. कॉफीचे दर २० ते ३० रुपये आहे. शीतपेय ४० ते ६० रुपयांत मिळते, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. बाजारातील इतर साहित्याचे दरही अधिक आहेत. बाजारातील दरांपेक्षा निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले दर कमी असल्याचे यावरून दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR