नागपूर : प्रतिनिधी
विदर्भातील दिग्गज विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून माजी मंत्री यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून शिवसेना शिंदे गटाचे अभिजित अडसूळ, धामणगाव येथून प्रताप अडसड, गोंदियातून भाजपचे विनोद अग्रवाल, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राजूरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे, चंद्रपूरमधून स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, चिमूरमधून काँग्रेसचे सतिश वारजुरकर, भाजपचे कीर्तीकुमार भांगडिया, वरोरातून काँग्रेसच्या खा. प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांनी काँग्रेसकडून नामांकन दाखल केले.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना शिंदे गटाकडून तर राळेगाव येथून भाजपचे डॉ. अशोक उईके, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधून भाजपचे आ. समीर कुणावार, वर्धा येथून भाजपचे पंकज भोयर यांनी उमेदवारी दाखल केली.
महायुतीत पहिली बंडखोरी
नागपूरमध्ये निवडणुकीत बंडखोरांनी आपले रंग दाखविणे सुरू केले आहे. याची सुरूवात नागपूर येथून झाली आहे. शहरातील एकूण सहा जागांपैकी महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी भाजपचे कृष्णा खोपडे यांच्या विरोधात नामांकन दाखल करून बंडखोरीचा बिगूल फुंकला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमधून काँग्रेसच्या अनुजा केदार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.