25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरमहाराष्ट्राचा कल ‘मविआ’कडे!

महाराष्ट्राचा कल ‘मविआ’कडे!

१५८ मतदारसंघात ‘मविआ’ तर १२५ ठिकाणी महायुती आघाडीवर

लातूर : निवडणूक डेस्क
लोकसभा निवडणुकीतील मतदान व विधानसभा निवडणुकीतील मतदान यामध्ये बराच फरक असू शकतो. पण या मतदानातून राज्याच्या राजकीय मतविभागणीचा साधारण अंदाज येणं शक्य आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी महायुतीकडे अवघ्या १७ जागा गेल्या. त्यामुळे राज्यात मतदारांचा कौल विरोधकांच्या अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येते. आकडेवारीचा विचार करता महाविकास आघाडीकडे असणा-या ३१ लोकसभा मतदारसंघांनुसार एकूण १५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे प्राबल्य आहे. याचा अर्थ १४५ हा सत्तास्थापनेचा जादुई आकडा महाविकास आघाडी सहज गाठेल. दुसरीकडे महायुतीकडे असणा-या १७ जागांनुसार त्यांच्याकडे १२५ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे.

दोन्ही आघाड्यांमधले अंतर ३३ विधानसभा मतदारसंघांचे आहे. त्यातल्या ३१ मतदारसंघांमध्ये अवघ्या पाच हजार मतांनी विजय किंवा पराभव घडून आले आहेत. त्यात मुंबईतील अंधेरी पश्चिम व मालाड पश्चिम ते पालघरमधील डहाणू आणि बीडमधील माजलगाव अशा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या काठावरच्या मतदारसंघांमध्ये निकाल कोणत्याही बाजूने लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे ३१ मतदारसंघही दोन्ही बाजूंना जवळपास समसमान आहेत. त्यातील १६ मतदारसंघांमध्ये मविआ तर १५ मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर आहे.

अर्थात, १६ मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला असला, तरी मविआचे उमेदवार पाच हजारांहून कमी मतांनी पिछाडीवर होते. दुसरीकडे १५ मतदारसंघांमध्ये मविआचा विजय झाला असला, तरी महायुतीचे उमेदवार पाच हजारहून कमी मतांनी पिछाडीवर होते.

महायुती आघाडीवर असलेले मतदारसंघ :
नेवासा, मावळ, महाड, कराड दक्षिण, शिरोळ, सांगोला, अहमदपूर, उदगीर, मालेगाव, भोकर, पुसद, धुळे शहर, पुणे कँटोनमेंट
‘मविआ’ आघाडीवर असलेले मतदारसंघ :
डहाणू, पाटण, मुखेड, देगलूर, नायगाव, हदगाव, रामटेक, भोकरदन, कराड उत्तर

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये अनुक्रमे २०२२ व २०२३ या वर्षी पडलेल्या फुटीमुळे राज्यातल्या सत्ता समीकरणांमध्ये मोठे उलटफेर झाले. बदललेल्या परिस्थितीत मविआमध्ये काँग्रेससह शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन पक्ष आले. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना (एकनाथ श्ािंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे दोन पक्ष आले.

काठावरच्या ३१ मतदारसंघांचे पक्षनिहाय गणित पाहिल्यास भाजप ९ ठिकाणी आघाडीवर तर ११ ठिकाणी पिछाडीवर आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) ५ ठिकाणी आघाडीवर तर ५ ठिकाणी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) एका ठिकाणी आघाडीवर आहे. दुसरीकडे मविआमध्ये काँग्रेस ८ ठिकाणी आघाडीवर असून ६ ठिकाणी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) २ ठिकाणी आघाडीवर तर २ ठिकाणी पिछाडीवर आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) ६ ठिकाणी आघाडीवर तर ६ ठिकाणी पिछाडीवर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR