25.5 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeमहाराष्ट्रवांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; ९ जखमी

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; ९ जखमी

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर भारताकडे जाणा-या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुटणा-या मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळपासून या घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचे नियोजन कारणीभूत असल्याची चर्चा आहे. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन नीट न करता आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते.

रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनसवर पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. वांद्रे ते गोरखपूरसाठीची २२९२१ अंत्योदय एक्सप्रेस फलाट क्रमांक १ वर आल्यानंतर हा प्रकार घडला. ही गाडी स्थानकात येत असतानाच काही प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी सामान घेऊन गाडीत चढायला सुरुवात केली. या एक्स्प्रेस ट्रेनचे २२ डबे अनारक्षित होते. त्यामुळे या गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. याचे पर्यवसान चेंगराचेंगरीत होऊन अनेक प्रवासी जखमी झाले.

ही घटना पहाटे घडल्यामुळे बराचवेळ याबद्दलची माहिती समोर आली नाही. मात्र, सकाळी ही बातमी पसरल्यानंतर अनेकांनी वांद्रे टर्मिनसच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक नंबर प्लॅटफॉर्मवरील रेल्वे ट्रॅकवर चपलांचा खच पडल्याचा दिसत होता. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच रेल्वेकडून तातडीने या चपला हटवण्यात आल्या.

दुर्घटनेला रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत?
या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर बराच काळ याबद्दलची माहिती बाहेर आली नाही. व्हीडीओ समोर आल्यानंतर ही घटना समोर आली तेव्हा वांद्रे-गोरखपूर ट्रेन ही वांद्रे टर्मिनसवरून निघाली होती. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन न करता आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. मात्र, रेल्वे विभागाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR