लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बेमोसमी पाऊस पडत आहे. दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत लातूर जिल्ह्यामध्ये पाच महसूली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. औसा तालुक्यातील भादा महसूली मंडळात ९२.०३ मिली मीटर एवढा पाऊस नोंदला गेला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये अनेक महसूली मंडळात २८, ३०, ४०, ४५, ५० मिली मीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. भादा महसूली मंडळात ९२.०३ मिली मीटर, पानचिंचोली महसूली मंडळात ७४ मिली मीटर, बोरोळ महसूली मंडळात ७७.०३, तांदूळजा महसूली मंडळात ५४ मिली मीटर, कासारखेडा महसूली मंडळात ५१.०८ मिली मीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने ब-याच शेतक-यांना कही खुशी, कही गम, असा अनुभव दिला आहे. ज्यांच्या तूरी फु लो-यात आल्या आहेत त्या शेतक-यांना या पावसाने नुकसान होऊ शकते. फळबागांना याचा फटका बसू शकतो. मात्र रब्बीचा पेरा करणा-या शेतक-यांच्या पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
लातूर जिल्ह्यात तूर, हरभ-याप्रमाणेच निर्याक्षम द्राक्ष बागाही मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा उभ्या आहेत. यात किमान १५० हेक्टर क्षेत्र निर्याक्षम द्राक्षाचे आहे. औसा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी खूप काळजी घ्यावी लागते. द्राक्षाच्या मण्यावर थोडाजरी परिणाम झाला तर त्यांची खरेदी केली जात नाही. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस पडत आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुर, हरभरा, ज्वारी, ऊसाचे नुकसान झाले आहे. फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. लातूर शहरातही पावसाचा तडाखा बसला आहे. मंगळवारी रात्री पडलेल्या वादळी पावसाने महावितरणच्या विद्यूत तारा अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने शहराच्या पुर्व भागातील विद्यूत पुरवठा बंद केला होता. परिणामी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण पूर्वभाग अंधारात होता. तसेच अंजलीनगर, इस्त्लामपूर, बादाडेनगर आदी सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमले. पावसाचे हे पाणी अनेक घरांतून घूसल्याने अनेकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नूकसान झाले.