20.2 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeलातूरलातूरात डोक्यात दगड घालून मुंबईच्या तरुणाला पेटविले

लातूरात डोक्यात दगड घालून मुंबईच्या तरुणाला पेटविले

पाच तासांत आरोपी गजाआड

लातूर : ‘माझ्या जागेवर का झोपलास असा जाब विचारत भंगार गोळा करणा-या आरोपीने नवी मुंबईतील तरुणाच्या डोक्यात दगड घताला आणि अंथरुण पेटवून दिले. ही घटना रविवारी लातुरातील एक नंबर चौकात घडली. त्यानंतर तत्परतेने पोलिसांनी पाच तासातच आरोपीला जेरबंद केले.

पोलिसांनी सांगितले, गेल्या पंधरा वर्षांपासून फिरून भंगार गोळा करणारा आरोपी सचिन शिवाजी वाघमारे (रा. बर्दापूर, जि. बीड) दररोज रात्री एकनंबर चौकात आसरा घेत होता. तो ज्या जागी झोपतो त्याच ठिकाणी, नवी मुंबईतील लक्ष्मण सुभाष गजघाटे आला. त्याने आरोपी सचिनला तेथून हुसकावून लावत तो अंथरुणावर झोपला.

थोड्यावेळाने सचिन रोजच्या जागेवर पुन्हा आला. तेव्हाही लक्ष्मणला झोपलेले पाहून आरोपीने लक्ष्मणच्या डोक्यात चारवेळा दगड घातला. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने अंथरुणाला पेटवून दिले. त्यामुळे लक्ष्मणचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, पोलिस पथकामधील सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, खुर्रम काझी, संजय कांबळे, विनोद चलवाड, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, राहुल कांबळे, चंद्रकांत मुंडे, बंडू निटुरे यांनी आरोपीला जेरबंद केले.

गुन्ह्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शहरातूनच पाच तासांत अटक केली. त्याच्याकडे मयत तरुणाचा मोबाईल व घड्याळ आढळून आले. घटनाक्रम रुग्णालय आणि नजीकच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमे-यात दिसत आहे.

लक्ष्मण गजघाटे नवी मुंबई येथून २४ ऑक्टोबर रोजी लातुरातील बहिणीकडे औषधोपचारासाठी आला होता. पोलिसांनी सांगितले, तो दारू पीत असल्याने उपचारात अडचणी येत होत्या. तो २६ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता बाहेर जाऊन येतो म्हणून बाहेर पडला होता.

आरोपीची पार्श्वभूमी गुन्ह्याची नाही
गुन्ह्यातील आरोपी व मयत हे एकमेकाला ओळखत नसून त्यांचा आपसामध्ये संबंध नाही. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसून किरकोळ कारणावरून खून झाल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनाही व्यक्तिगत, किरकोळ कारणातून झाल्या असून त्यातील आरोपींना अटक केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिस यंत्रणा सतर्क असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR