परभणी : दक्षिण मध्य रेल्वेने दिवाळी आणि छटनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड-पटना-नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या ६ फे-या पूर्ण करण्याचे ठरविले आहे. या गाडीला २२ डबे असणार आहेत. दिवाळी निमित्त सोडलेल्या या विशेष गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नांदेड रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.
गाडी संख्या ०७६१५ विशेष गाडी दि. २९ ऑक्टोबर तसेच ५ आणि १२ नोव्हेंबर रोजी मंगळवारी हजूर साहिब नांदेड येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर मार्गे पटना येथे गुरुवारी रात्री १२.३० वाजता पोहोचेल. गाडी संख्या ०७६१६ पटना – नांदेड विशेष गाडी दि. ३१ ऑक्टोबर तसेच ७ आणि १४ नोव्हेंबर रोजी गुरुवारी पटना येथून सकाळी २.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हजूर साहिब नांदेड येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोहोचेल. या गाडीत जनरल, स्लीपर आणि वातानुकुलीत मिळून २२ डब्बे असतील. या विशेष गाडीमुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाली असून प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.