मुंबई : विशेष प्रतिनिधी
माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचे तगडे आव्हान आहे. तसेच ठाकरे सेनेचे महेश सावंत हे देखील सरसावले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (मंगळवार, २९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. ते मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरताना सामना शाखेपासून भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे स्वत: सदा सरवणकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांच्याकडूनच परवानगी मिळाली असल्याची महत्त्वाची माहिती सरवणकर यांनी दिली.
सदा सरवणकर अर्ज भरणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत हे निवडणुकीतील तिसरे महत्त्वाचे उमेदवार आहेत.
सदा सरवणकर यांची राजकीय कारकिर्द तीन दशकांपेक्षा जास्त आहे. ते १९९२ साली सर्वप्रथम मुंबई महापालिकेचे नगरसेवक बनले. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळले आहे. २००४ साली ते पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते.