23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरलातूर शहर मतदारसंघासाठी ५ वर्षांत २ हजार ४०० कोटींचा निधी आणला

लातूर शहर मतदारसंघासाठी ५ वर्षांत २ हजार ४०० कोटींचा निधी आणला

पत्रकार स्नेहभेटीत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली माहिती
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी २०१९ ते २०२४ या पाच वर्षात २ हजार ४०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला. या निधीतून असंख्य मुलभूत विकासकामे करता आली. आधी केले मग सांगितले. हवेत बोलत नाही. मतदारसंघातील बरेच प्रश्न सोडवले, काही राहिलेत. ते प्रश्नही सोडविण्याचा संकल्प घेऊन मतदारांशी प्रेमळ साद घालत आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी पत्रकारांची स्नेहभेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार सुरेश जेथलिया, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनिल बसपुरे, सुनिताताई चाळक, शेकापचे अ‍ॅड. उदय गवारे, समाजवादी पार्टीचे अली शेख, आपचे प्रताप भोसले, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अ‍ॅड. शेखर हविले, व्यंकटेश पुरी यांची उपस्थिती होती.
भाजपा महायुतीच्या फोडाफोडीचे राजकारण जनतेला पटलेले नाही. राजकारण सर्वसामान्यांसाठी करावयाचे असते. परंतु केवळ निधीसाठी भाजपा महायुतीची सत्ता स्थापन झाली. सरकारही निधीभोवती फिरत आहे, असा घणाघाती आरोप करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले की, भाजपा महायुती सरकारचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला आहे. राज्यातील जनतेची प्रचंड पिळवणूक होत आहे. महाराष्ट्र पारदर्शक, प्रगतीशील होते. परंतु महायुतीने राज्याची दुरवस्था करून टाकली आहे. या सरकारला राज्याच्या औद्योगिकरणाची गती राखता आली नाही. लातूरमध्ये गेल्या १० वर्षांत एखादा उद्योग आला नाही. रेल्वे बोगी कारखाना असून अडचण, नसून खोळंबा आहे. या बोगी कारखान्यातून अद्याप एकही बोगी तयार होऊन बाहेर पडलेली नाही. भाजपा महायुती सरकारने मोठा गाजावाजा करुन लातुरात रोजगार महामेळावा घेतला. परंतु किती बेरोजगार युवकांना नोक-या दिल्या, हे त्यांनी सांगावे. जनसामान्यांची होणारी होरपळ त्यांना दिसत नाही. राज्य सरकारचा एकही विभाग भ्रष्टाचारमुक्त नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी हा आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्टा करु, असेही माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले. यावेळी राजा मणियार, अ‍ॅड. उदय गवारे, प्रताप भोसले, अली शेख, सुनिल बसपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मोईज शेख यांनी केले तर व्यंकटेश पुरी यांनी सूत्रसंचालन केले.
शेतमालाला भाव नाही,
महागाई गगनाला भिडली
शेतमालाचे भाव, शेतक-यांची आत्महत्या, खते, बी-बियाणांबाबतचे धोरण, भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे वाढलेले दर, बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था, शासन आणि प्रशासनामध्ये वाढलेला दलालांचा सुळसुळाट हे गंभीर प्रश्न आहेत. परंतु याकडे भाजपा महायुती सरकारचे अजिबात लक्ष नाही. महायुतीतील नेते एकमेकांना सांभाळण्यातच व्यस्त आहेत., असा आरोपही माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR