छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीने मोठ्या प्रमाणावर आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यातच भाजी बाजारात शेवगा १६० रुपये किलोपर्यंत पोहोचला असून, किरकोळ भाजी बाजारात वांगी, टोमॅटो, भेंडी, फ्लॉवरसह सर्वच फळभाज्यांचा सरासरी ८० रुपये किलोचा दर पाहायला मिळत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली असून, भाजीपाल्याचे दरदेखील वाढले आहेत. भाजी बाजारात निवडक पालेभाज्यांसह फळभाज्यांचे भाव सरासरी ६० ते १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत. शेवग्याच्या शेंगा १६० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. पावकिलोला मात्र ३० रुपयांचा दर मिळतोय.
शिवाय, मेथी, शेपूच्या भाजीची जुडी ३० रुपयांना मिळत आहे. दिवाळीत यंदा किराणा साहित्य महागल्याने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच मागील आठ दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. आद्रक, लसणाचे दर मात्र मागील दोन महिन्यांपासून जैसे थे आहेत. सध्या लातूरच्या बाजारात आद्रक १२० ते १५० रुपये किलो तर लसूण ३०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.
कढीपत्ता खातोय भाव
दिवाळीत चिवड्यासाठी लागणारा कढीपत्ता चांगलाच भाव खात आहे. दहा रुपये छटाकप्रमाणे कढीपत्ता मिळत आहे. सध्या लातूरच्या बाजारात भाजीपाल्यांची आवक घटल्यामुळे दरवाढ झाली आहे.
शेतक-यांनाही मोठा फटका
वाढलेल्या भाजीपाला दराचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना शेतक-यांनाही अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. यंदाही वाशिम जिल्ह्यात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र, सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. यात टोमॅटोसह कोथिंबीर, वांगी, पालेभाज्या, कोबी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही घटली आहे.