मुंबई : महायुतीतील जागावाटपाची स्थिती काही वेळापूर्वीच स्पष्ट झाली होती. भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीचेही जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर दोन-दोन उमेदवार दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गु-हाळ एवढे प्रदीर्घ चालले होते की शेवटचा दिवसही या याद्या प्रसिद्ध करण्याचाच होता. तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल याची सोय करण्यात आली होती. परंतू, यामुळे पाच ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या एबी फॉर्मवर अर्ज भरले आहेत. याचे चित्र आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला १४८ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला ८५ आणि अजित पवार गटाला ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीमध्येकाँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. पाच जागांवर तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार असलेले मतदारसंघ हे मिरज, सांगोला, पंढरपूर, परांडा, दिग्रस हे आहेत. आता या जागांवर कोण माघार घेते किंवा मैत्रिपूर्ण लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.