27.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रनांदगावच्या बंडखोरीला शिंदे सेनेचे आक्रमक प्रत्युत्तर

नांदगावच्या बंडखोरीला शिंदे सेनेचे आक्रमक प्रत्युत्तर

राष्ट्रवादीविरुद्ध शिंदेंचे २ उमेदवार रिंगणात हेलिकॉप्टरमधून पाठवले ए, बी फॉर्म

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघात शिंदे सेनेच्या सुहास कांदे यांच्या विरोधात केलेल्या बंडखोरीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाने थेट हेलिकॉप्टरमधून ए, बी फॉर्म पाठवून देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात राजश्री अहिरराव आणि धनराज महाले यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोर उतरवल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.

अजित पवार गटाने देवळालीत आमदार सरोज अहिरे आणि दिंडोरी मतदारसंघात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिली आहे मात्र, अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाने आपले उमेदवार रिंगणात उतरवून त्यांना धक्का दिला आहे. यासाठी खास हेलिकॉप्टरने नाशिकला ए, बी फॉर्म पाठवण्यात आले.

नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ हे अपक्ष मैदानात उतरले आहेत. नांदगावमध्ये अजित पवार गटाकडून अप्रत्यक्षपणे शिंदे गटाविरोधात बंडखोरी झाली. शिंदे गटाने २ मतदारसंघांत अधिकृत उमेदवार देत दबावतंत्राची खेळी केली. मैत्रीपूर्ण लढत फक्त नांदगावमध्ये नाही तर अन्य ठिकाणीही होऊ शकते, असा इशारा शिंदे यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR