पुणे : प्रतिनिधी
यंदाची दिवाळी ही सर्वसामान्यांसाठी महागाईचा फटका देणारी ठरत असल्याचे बोलले जात आहे. किराण्याचा खर्च असो की गोडधोड पदार्थ यांचे दर यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहेत. यातच फटाक्यांचे दरसुद्धा ३० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे किराण्याचा अर्धा खर्च फटाक्यावरच होणार आहे, असे दिसून येते. ३० टक्के महागाई असली तरी फटाक्यांचे बार मात्र उडणारच असे दिसून येत आहे.
चार दिवसांपूर्वी फटाकेविक्रीची दुकाने थाटली आहेत. या दिवाळीपूर्वी आठ ते पंधरा दिवस आधी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या दुकानांना फटाकेविक्रीची परवानगी दिली जाते. त्यानुसार फटाकेविक्रीच्या दुकानांमध्ये विविध फटाके विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
बच्चे कंपनीमध्ये फॅन्सी फटाक्यांचे आकर्षण असते. यात वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फॅन्सी फटाक्यांचे दर वाढले आहेत. दोनशे रुपयांचे फॅन्सी फटाके आता २८० ला मिळत आहेत.
तामिळनाडूमधील शिवकाशी या ठिकाणी फटाके तयार होतात. येथे फटाके तयार करण्याचे मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत. देशभरात याच ठिकाणाहून साठा विक्रीसाठी पाठविला जातो.
शहरात फटाक्यांची जवळपास ३५ हून दुकाने आहेत. या दुकानांमध्ये दिवाळीपर्यंत होणा-या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून जवळपास पाच कोटींची उलाढाल होऊ शकते, असा अंदाज काही व्यापा-यांनी व्यक्त केला. त्यामुळे सध्या ग्राहक नसले तरी आगामी काळात ग्राहकांवरच ही उलाढाल अवलंबून आहे.