अहिल्यानगर/मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरांचे पेव फुटले असून त्यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू आहे. अन्यत्र संधी देण्याचे आश्वासन, राजकीय पुनर्वसनाची ग्वाही देऊन त्यांची मिनतवारी केली जात आहे. याचेच एक मजेशीर उदाहरण आज समोर आले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात भाजपाच्याच राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली. काल त्यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज भरला. आज त्यांना विशेष विमान पाठवून शिर्डीहून मुंबईला आणून समजूत काढण्यात आली.
भाजपच्या राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पिपाडा दाम्पत्याने बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. राजेंद्र पिपाडा यांना मुंबईत बोलावण्यात आले होते. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी भाजपकडून खास शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आले होते. राजेंद्र पिपाडा विशेष विमानाने मुंबईला आले.