नवी दिल्ली : संपूर्ण जगतात भारताची ओळख एक हिंदूंचा देश अथवा हिंदू बहूल देश म्हणून आहे. येथे सर्व धर्माचे लोक अगदी आनंदाने राहतात. एवढेच नाही तर भारताचे संविधानही या सर्व धर्मांना आपापल्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. धर्मांसंदर्भात जगातील विविध संस्था सातत्याने सर्वेक्षण करत असतात. अशाच एका प्यू रिसर्च नामक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २०५० पर्यंत हिंदू धर्म जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म बनेल. तर भारत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश म्हणून इंडोनेशियाला मागे टाकेल.
प्यू रिसर्च सेंटरच्या द फ्यूचर ऑफ वर्ल्ड रीजन्स या अध्ययनात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, जगभरातील हिंदुंची लोकसंख्या २०५० पर्यंत जवळपास ३४% वाढून १.४ बिलियनवर पोहोचेल. ख्रिश्चन धर्म (३१.४%) आणि मुस्लीम धर्म(२९.७%) नतंर, जागतिक लोकसंख्येत हिंदूंची लोकसंख्या १४.९% एवढी असेल. तर भारतात इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वांधिक मुस्लीम असतील. दरम्यान युरोपमधील हिंदूंची संख्या वाढून जवळजवळ दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
प्रामुख्याने स्थलांतराचा परिणाम म्हणून युरोपातील हिंदूंची सध्याची १.४ अब्ज (युरोपच्या लोकसंख्येच्या ०.२ टक्के) ही संख्या वाढून २.७ अब्ज (०.४ टक्के) इतकी होण्याचा अंदाज अहवालाने वर्तवला आहे. उत्तर अमेरिकेत स्थलांतराचा मुद्दा विचारात घेता हिंदू लोकसंख्येचे प्रमाण २०१० सालातील ०.७ टक्क्यांवरून २०५० साली १.३ टक्क्यÞांपर्यंत पोहचेल, अन्यथा ते सध्याइतकेच राहील असेही अहवालात नमूद केले आहे.
मुस्लीम ३१० मिलियन हून अधिक होणार
या अध्ययनानुसार, २०५० पर्यंत भारतातील मुस्लिमांची संख्या ३१० मिलियन हून अधिक होईल. तर हिंदूंची संख्या ७७% सह बहुमतात राहील. तर मुस्लीम सर्वांत मोठे अल्पसंख्याक (१८%) राहतील.
हिंदूंची लोकसंख्या घटणार
भारतात अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाची संख्या वाढेल, तर काही मुस्लीम बहूल देशांमध्ये हिंदूंची संख्या कमी होईल. कमी प्रजनन दर, धर्मांतर आणि स्थलांतर आदी कारणांमुळे २०५० मध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होईल.
पाकमध्येही बदल घडणार
पहिला देश जेथे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, तो म्हणजे पाकिस्तान. २०१० मध्ये तेथे १.६ टक्के हिंदु होते. जे प्यू रिसर्चनुसार २०१५ मध्ये कमी होऊन १.३ टक्का झाले. यानंतर, बांगला देशात २०१० मध्ये ८.५ टक्के हिंदू होते. २०५० मध्ये ते ७.२ टक्के होण्याचा अंदाज आहे. तसेच अफगाणिस्तानात २०१० मधील ०.४ टक्के हिंदू होते. ते आता ०.३ टक्के होण्याचा अंदाज आहे.