कुर्डुवाडी : दिवाळी हा सण प्रत्येकासाठी विशेष असतो. एकीकडे देशभरात दिवाळी सण सगळीकडे साजरा केला जात असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैराव (ता. माढा) येथील सीना नदीपात्रात चार ऊसतोड कामगार बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेले चारही ऊसतोड कामगार हे यवतमाळ जिल्हातील आहेत. गुरुवार (दि. ३१) दुपारी बाराच्या सुमारास खैराव येथील सीना नदीपात्रात ही घटना घडली.
शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६, दोघे रा. लासण टेकडी, ता. यवतमाळ) व अजय महादेव मनगाव (वय २५), राजीव गेडाम (वय २६, दोघे रा. पटा पांगरे, जि. यवतमाळ) अशी नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
माढा तालुल्यातील खैराव येथील जगदाळे वस्ती येथे यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची टोळी आली होती. या टोळीतील चार ऊसतोड कामगार खैराव येथील सीना नदीपात्रात कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी गेले होते. त्यातील शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागल्यावर प्रकाश त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो बुडू लागल्याने इतरही दोघे पाण्यात उतरले. नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने भोवरा निर्माण झाला आहे. याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले असून बुडालेल्या चौघांचा शोध सुरू आहे.