कोल्हापूर : डॉ.राजेंद्र भस्मे
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहीला. अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यानीच माघार घेतली आणि त्याचे पर्यवसन जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील आणि खा. शाहू महाराज यांच्यात वादात झाले.
कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीतून उमेदवार कोण ? हा विषय चर्चेत असताना प्रथम शिवसेनेने या मतदार संघावर दावा केला. विभाग प्रमुख संजय पवार, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यानी उमेदवारी मागितली. पण या मागणीत फारसा जोर राहीला नाही. यामुळे विद्यमान आमदार असलेल्या पक्षाकडेच तो मतदारसंघ या धोरणानुसार काँग्रेसने आपलाच उमेदवार असणार हे निश्चीत केले.
विद्यमान जयश्री जाधव या इच्छुक होत्या त्यांची तयारीही होती पण आ. सतेज पाटील यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ते दुस-याच उमेदवार शोधात होते. दिवंगत आ. चंद्रकात जाधव यांच्याप्रमाणे उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात चांगली प्रतिमा असलेल्या उद्योजकांची चाचपणीही केली पण त्या उद्योजकांनीच असमर्थता दर्शवली. राजकिय क्षेत्रातून पुढे येणारी नावे आ. सतेज पाटील यांच्या पसंतीस येत नव्हती. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली तरी सक्षम उमेदवार मिळेना.
राज्य पातळीवर काँग्रेसच्या यादीत माजी नगरसेवक राजू लाटकर यांचे नाव जाहीर झाले. पण ते पक्षात आणि आघाडीतही कोणाला रुचले नाही. अनेकांनी राजू लाटकर याना उघड विरोध केला. पक्ष नेतृत्व म्हणून आ. सतेज पाटील यानां त्याची दखल घ्यावी लागली. आणि अधिकृत उमेदवार म्हणून मधुरिमाराजे छत्रपती यानां तयार केले. अर्थातच खा. शाहू महाराज, माजी आ. मालोजीराजे यासाठी अनिच्छेनेच तयार झाले. रितसर शक्ती प्रदर्शन करीत मधुरिमा राजे यानी उमेदवारी अर्ज भरला आणि प्रचारही सुरु केला. दरम्यान काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यानी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत कॉग्रेसला रामराम करून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा काँग्रेससाठी मताच्या दृष्टिकोनातून मोठा धक्का बसला. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यानीही आपल्याला विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरून आ. सतेज पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आगपाखड केली.
राजू लाटकरही आपल्या उमेदवारीसाठी हट्टाला पेटले. त्यानी बंडखोरीचा निर्णय घेतला. स्वत: खा. शाहू महाराज यानी लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजू लाटकर गायब झाले. आणि त्यांची बंडखोरी निश्चीत झाली. यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांच्या पराभवाची छाया अधिक गडद झाल्याची जाणीव छत्रपती घराण्याला झाली. त्यामुळे खा. शाहू महाराज, मालोजीराजे, मधुरिमाराजे यानी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि अखेरच्या क्षणी मधुरिमाराजे छत्रपती यानी माघार घेऊन काँग्रसला आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील याना जबर धक्का दिला.
आ. सतेज पाटील यामुळे चांगलेच संतप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यलयातच त्यानी खा. शाहू महाराजांना खडे बोल सुनावले. दम नव्हता तर उभा रहायचं नाही!, मीही माझी ताकत दाखवली असती. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? असे विचारल्या नंतरही खा. शाहू महाराज यानी कसलेही प्रत्युत्तर दिले नाही. आ.सतेज पाटील मधुरिमाराजेंच्या माघारीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांना ज्यानी ही आग लावली त्याना सोडणार नाही. असा दम देत माध्यमांशी न बोलता रागाने निघून गेले.
खा. शाहू महाराज यांनी राजू लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहीजे म्हणून माघार घेत असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगीतले. तर मालोजीराजे यानी सध्या मानसिक स्थिती बरोबर नाही. मतदारांसह सर्वांशी नंतर बोलेन असे सांगून निघुन गेले.