छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
भाजपा मागील दहा वर्षांपासून हिंदू, मुस्लिम राजकारण करीत आहे. ‘काटेंगे तो बटेंगे’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. हा देश योगी यांचा नसून सर्वांचा आहे. टिळा लावणारे, पगडी बांधणारे आणि दाढी ठेवणारे सर्वांचा हा देश आहे.
जातीय राजकारण नको, असे कधीही भाजपने म्हटलेले नाही, असा टोलाही एमआयएम नेते अकबरोद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) लगावला. भाजपामुळे देश कमकुवत होत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
शहरातील आमखास मैदानावर नासेर सिद्दिकी आणि इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ रात्री जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ओवेसी म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेनेचे दोन तुकडे झाले. सत्तेसाठी राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. यांना फक्त सत्ता हवी आहे, ती कोणत्याही मार्गाने आली तरी चालेल. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी यांना काहीच देणे-घेणे नाही. बेरोजगारी वाढली, महिलांवरील अन्याय-अत्याचारांत वाढ झाली. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत, गॅस सिलिंडर महागला तरीही सरकारला काही देणे-घेणे नाही. मागील तीस वर्षांत मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला एक रुपयाही देण्यात आला नाही. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने किमान ५० हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तत्पूर्वी पक्षाचा जाहीरनामा ओवेसी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
मराठा, मुस्लिम, दलितांनी एकत्र यावे
भाजपा बेरोजगारी, महागाई आदी विषयांवर बोलत नाही, हिंदू, मुस्लिम करत राज्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत मराठवाड्याच्या तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा, मुस्लिम, दलितांनी एकत्र यावे, असे आवाहन अकबरोद्दीन ओवेसी यांनी केले.