छत्रपती संभाजीनगर : उमेदवारी दाखल जाहिर झाल्यानंतर अचानक मध्य मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेणारे उद्धवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तनवाणी यांच्या राजीनाम्याने उद्धवसेनेला धक्का बसला आहे.
शिवसेनेत असताना तनवाणी यांना पक्षाने महापौर, विधान परिषदेचे आमदार आदी पदावर काम करता आले होते. पक्षाच्या नेत्यासोबत न जमल्याने ते भाजपमध्ये गेले होते. भाजपचे शहराध्यक्षपदावर त्यांनी काही वर्ष काम केले. सुमारे साडेतीन वर्षापूर्वी ते शिवसेनेत परतले. जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते उद्धवसेनेसोबतच राहिले. पक्षाने त्यांची दखल घेत त्यांना महानगरप्रमुख आणि नंतर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती दिली. आता मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांना पक्षाने उमेदवारीही दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस बाकी असताना अचानक त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
तनवाणी यांच्या या निर्णयाने उमेदवार बदलण्याची नामुष्की उद्धवसेनेवर आली. यामुळे पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून मुक्त केले. तेव्हापासून ते शिंदेसेनेत जातील अशी चर्चा होती. आज अचानक त्यांनी पक्षप्रमुखांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे कळविले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार पहिल्या टप्प्यात असातना आज अचानक तनवाणी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने आता त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.