सोलापूर – देशात अनेक प्रकारचे नरेटिव्ह पसरवले जात आहेत. त्यामुळे हिंदुराष्ट्र स्थापनेचे कार्य करणाऱ्यांनी अश्या प्रकारच्या खोट्या नरेटिव्ह पासून सावध रहावे असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ या एक दिवसीय मोहिमेच्या समारोपीय व्याख्यानात ते बोलत होते. सोलापूर येथील भुईकोट किल्ला येथे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले कि, ‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी ज्याप्रमाणे काळाची पावले ओळखून निर्णय घेतले आणि प्रयत्न केले त्याप्रमाणे राष्ट्रभक्त आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’ या मोहिमेत सोलापूर शहरातील विविध भागातील अनेक युवक युवती सहभागी झाले होते.
या मोहिमेची सुरुवात छ. शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी मिळून किल्याची स्वच्छता केली. त्यानंतर स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. त्यात कराटे, लाठी- काठी आणि दंडसाखळीचे प्रकार दाखवण्यात आले.