जालना : विशेष प्रतिनिधी
परतूर विधानसभा मतदार संघातील महायुती, मविआच्या गडाला बंडखोरीचे ग्रहण लागले असून, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपमधील प्रमुख पदाधिकारी असले तरी आपली वेगळी चूल मांडून राजकारण करणारे बबनराव लोणीकर आणि मविआतील मित्रपक्ष उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.
भाजपच जिल्ह्यातील तीन जागा लढवत असून, त्यात परतूर येथे माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परतूर विधानसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार आहेत. त्यात महायुतीतील मित्रपक्ष भाजपकडून आ. बबनराव लोणीकर, मविआतील मित्रपक्ष उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
परंतु, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल आणि मविआतील मित्रपक्ष काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. जेथलिया यांनी यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. लोणीकर यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे ते तगडे उमेदवार मानले जातात. शिवसेना शिंदे गटाची मतदार संघात फळी मजबूत करण्यात अग्रवाल यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे ते ए.जे. बोराडे यांची डोकेदुखी वाढवू शकतात.
११ उमेदवार, चार अपक्ष
या मतदार संघात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह बसपाचे अहेमद महंमद शेख, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) चे आसाराम राठोड, ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पार्टीचे कृष्णा पवार, जय सेवालाल बहुजन विकास पार्टीचे श्रीराम जाधव, वंचित बहुजन पार्टीचे रामप्रसाद थोरात यांच्यासह चार अपक्ष उमेदवारही निवडणूक आखाड्यात आहेत.