26.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमविआच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची उधळण

मविआच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची उधळण

५०० रुपयांत ६ सिलेंडर, २.५ लाख पदांची भरती १०० युनिटपर्यंत मोफत वीज, शक्ती कायद्याची अंमलबजावणी

मुंबई : प्रतिनिधी
राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीरसभेत ५ मोठ्या घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीने आज आपला विस्तृत जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘महाराष्ट्रनामा’ नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयांत ६ गॅस सिलेंडर, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा, १०० युनिटपर्यंत मोफत वीज, २.५ लाख सरकारी नोकर भरती आदी आश्वासन देण्यात आली आहेत.

महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजपा युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

महाविकास आघाडीच्या ६ तारखेला झालेल्या जाहीरसभेत महिलांना दरमहा ३ हजार मानधन व मोफत बस प्रवास, बेरोजगारांना दरमहा ४ हजार, शेतक-यांची ३ लाखापर्यंतची कर्जमाफी, जातनिहाय जनगणना, मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण, २५ लाखांचा आरोग्य विमा आदी घोषणा करण्यात आल्या होत्या.

आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मविआतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही देताना जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली.

नोक-यांमधील कंत्राटी पद्धत बंद करणार
यासोबतच सरकारी नोक-यांतील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्राम विकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रनामा प्रकाशित करीत आहोत, असे सांगण्यात आले.

इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनविला जाईल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार स्थापन करू तसेच २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून केला आहे.

महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्ट्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पहातात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR