मानवत : मानवतरोड रेल्वे प्रवाशांना मदत करण्याऐवजी रेल्वे प्रवाशांची लूट व अडवणूक होत आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना नियमबा ५ रुपये घेण्यात येत आहेत. त्यांना अरेरावीची भाषा वापरण्यात येत आहे.
अपंग व्यक्तींना रेल्वे स्टेशन मध्ये जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या सर्व बाबी येत्या दोन दिवसांत बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मानवतरोड रेल्वे स्टेशन प्रबंधक व मानवत पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे स्टेशनमध्ये आडवी मोठमोठी दगडे टाकलेली आहेत. त्यामुळे बरेच प्रवासी पडून जखमी झालेले आहेत. या सर्व बाबी येत्या दोन दिवसात बंद न झाल्यास व वाटे मधील दगडे न हटवल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव, कॉ. रामराजे महाडिक यांच्यासह सतिश मगर, पांडुरंग सत्वधर, गणपत सिसोदे, सुरज जंगले अनिल दहे, रियाज शेख, सचिन शिंदे, पिंटू अंभोरे, माणिक चव्हाण, कृष्णा देशमाने, पांडुरंग बुरकुले, सोनू खरात, भगवान तुरे, सांगू कोळी, तुकाराम चव्हाण, संतोष जंगले इत्यादीच्या स्वाक्ष-या आहेत. या संदर्भात मानवतरोड स्टेशन प्रबंधक व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.