निलंगा : प्रतिनिधी
निलंगा विधानसभा मतदारसंघात बळावलेला भ्रष्टाचार, कमिशनखोरी व दडपशाही संपुष्टात आणून सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज विधानसभेत पाठविण्याचा चंग आता मतदारांनी बांधला आहे. मतदारसंघात पहावयास मिळत असलेला मतदारांचा उत्साह पाहता निलंगा मतदारसंघात बदल घडणार असल्याचा विश्वास माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ आयोजित अंबुलगा (बु) येथील सभेत ते बोलत होते. मंचावर काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके, माजी खासदार सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, अॅड. नारायण सोमवंशी, शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे, अंबादास जाधव, कुमार पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, पंकज शेळके, चक्रधर शेळके, महिला तालुकाध्यक्षा आरती बालाजी भंडारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे, सरपंच स्वाती किरण शिंदे, उपसरपंच जगदीश सगर, गुंडेराव बिरादार, सुभाष शिंदे, महावीर काकडे,
महेश देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली असल्याचे द्योतक महाविकास आघाडीच्या होणा-या सभेवरून जाणवते. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निष्ठावंत काँग्रेसचा वारसा चालवायचा आहे. त्याची जबाबदारी आता अशोकराव पाटील यांच्या बरोबरच अभय साळुंके यांचीही आहे. सामान्य माणसांचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी अभय साळुंके यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी आंबुलग्यासह परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता तर लांबोटा व बोटकुळ येथील तरुणांनी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.