राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
गोंदिया : प्रतिनिधी
भारतीय संविधानात भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे विचार आहेत. छत्रपती शिवरायांचे, संतांचे विचार आहेत. या संविधानात समानता, प्रेम, सर्व धर्माचा आदर आहे. पणहे लाल रंगाचे संविधान दाखविले की पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करतात. या संविधानात लोकांना मारणे, शिव्या देण्याचा उल्लेख कुठेच नाही. शेतक-यांना हमी भाव देऊ नये, असेही लिहिलेले नाही. परंतु भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर २४ तास हल्ले करून ते संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आज गोंदिया येथे आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. भाजप सरकार महाराष्ट्रात शेतक-यांना धान्य, सोयाबीन आणि कापसाला किंमत देत नाही आणि मूठभर उद्योगपतींसाठी १६ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी ते करतात. मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतक-यांचे कर्ज का माफ केले नाही, असा सवालही त्यांनी केला. मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत. त्यांना गरीब, शेतकरी, सर्वसामान्यांची चिंता नाही. त्यांच्या हिताचा ते कधीच विचार करती नाहीत. ते आम्ही शेतक-यांसाठी कायदे आणत असल्याचे सांगत होते. मग या कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतक-यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
यासोबतच त्यांनी भाजप, आरएसएस संविधानावर कधीच समोरून हल्ले करीत नाही, तर लपून-छपून संविधान संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातूनच त्यांनी आमदारांची खरेदी करून सत्ता स्थापन केली. विद्यापीठावर आपल्या विचाराचे कुलगुरू थेट नेमले. शेतक-यांना हमीभावाचा हक्क असताना त्यांच्या मालाला हमीभाव दिला नाही. पण उद्योजकांचे कर्ज माफ केले. यातून संविधानावर हल्ले सुरू असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवरही भाष्य केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्यातील महिलांच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार असून शेतक-यांना कर्जमाफी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. लाल रंगाचे संविधान दाखवले गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर टीका करतात. या संविधात कुठेही लोकांना मारणे, लोकांवर अन्याय करणे आणि गरीब आणि शेतक-यांवर अत्याचार करणे लिहिले नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भाजप तसेच आरएसएसवर टीका केली.
मोदींकडून सतत
ओबीसींचा अवमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला ओबसी असल्याचे सांगतात. परंतु त्यांनी सतत ओबीसींचा अवमान केला आहे. ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्के असताना मोदी सरकार त्यांच्यावर फक्त ५ टक्के खर्च करते. हा खरा ओबीसींचा अवमान आहे. म्हणून कॉंग्रेस जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह धरीत आहे. तसेच आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटविण्याचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संविधान वाचविण्यासाठी
कॉंग्रेस पक्षाची लढाई
पंतप्रधान मोदी आणि आरएसएसचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पण काँग्रेस मात्र हे संविधान वाचवण्यासाठी लढाई लढत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.