उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्क्यारा बोगद्यातून मंगळवारी(२८ नोव्हेंबर) संध्याकाळी ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. देश आणि जगातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली १७ दिवस सिल्क्यारा येथे बचावकार्य सुरू होते. बुधवारी जेव्हा ऑपरेशन टीम मशिन्ससह निघाली तेव्हा ते ठिकाण निर्जन दिसत होते. बचाव मोहिमेदरम्यान बंद असलेले बोगद्याजवळील रस्ते बुधवारी खुले करण्यात आले होते.
मात्र, घटनास्थळी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सरकारने बोगद्याचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येथे काम करणा-या मजुरांना आता काही दिवसांसाठी सुटी देण्यात आली आहे. अशा स्थितीत या बोगद्याचे भवितव्य काय असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तराखंड सरकारचे सचिव नीरज खैरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी मजूरांना बाहेर काढण्यात यश आल्यानंतर बोगद्याच्यावरून सुरू असलेले ड्रिलिंग थांबविण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक एजन्सींनी बचाव कार्य केले. एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार, ६० जवान बचाव स्थळी तळ ठोकून होते. २० स्टँडबायवर होते. बुधवारी या सर्वांना परत जाण्यास सांगितले आहे. रैट-होल माइनर्सचे एक पथक दुपारी घटनास्थळी आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि काही वेळात ते देखील परत गेले.
१२ हजार कोटींचा प्रकल्प
१२ हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी सिल्क्यारा बोगदा प्रकल्प ४.५ किलोमीटर लांबीचा आहे. केंद्र सरकारच्या ९०० किमी लांबीच्या चार धाम यात्रा ऑल वेदर रोड प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग आहे. उत्तराखंड, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र शहरांना सर्व ऋतूमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
काही दिवस काम बंद राहणार
बोगद्याचे काम काही दिवस बंद राहणार असल्याचे तेथील एका पोलिस कर्मचा-याने सांगितले. मजूरांना दोन दिवस आराम करण्यासाठी सुट्या देण्यात आल्या आहेत. नाव समोर न सांगण्याच्या अटीवर एका मजूरांने सांगितले की, त्यांना दोन दिवस आराम करण्यासाठी सुटी देण्यात आली आहे. कंत्राटदाराकडून पुढील सूचना त्यांना देण्यात येणार आहेत. तर एका आधिका-यांचे याबाबत माहिती देताना सांगितले की, सरकारने बोगद्याचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिट पुर्ण होईपर्यंत काम बंद राहणार आहे.