19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeराष्ट्रीयघड्याळ चिन्ह गोठविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

घड्याळ चिन्ह गोठविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शरद पवारांची छबी वापरण्यास अजित पवार गटाला मज्जाव वैचारिक मतभेद असतील तर तुमच्या पायावर उभे राहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार गटाला मोठा दिलासा दिला. शरद पवार गटाने अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. त्याऐवजी तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा आणि त्यात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरु नका, अशा सूचना द्या, असे न्यायालयाने सुनावले. तसेच तुमचे वैचारिक मतभेद आहेत तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, असेही न्यायमूर्ती म्हणाले.

दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करावे. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो. दरवेळी मतदारांना प्रभावित करेल, असे नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले. अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. गेल्या सुनावणीत घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात अजित पवारांनी वर्तमानपत्रात द्यावी, असे निर्देश दिले होते.

आजच्या सुनावणीवेळी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. आम्ही बारामतीत फिरवत असलेल्या गाड्यांवर न्यायप्रविष्ठ असल्याविषयीची जाहिरात दिली आहे, असेही अजित पवार गटाच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. घड्याळ चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर अजित पवार गटाचे वकील म्हणाले की, कोणताही संभ्रम उरलेला नाही. हे कशाच्या आधारावर इथे अर्ज घेऊन आले, आम्ही न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याचा मजकूर सर्वत्र प्रसिद्ध केला, आज आम्ही पुरावे सादर केले, असे अजित पवारांच्या वकिलांनी सांगितले.

यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार हल्ला चढवला. हे स्वत: विरोधाभासी भूमिका मांडत आहेत. यांना शरद पवारांचे गुडविल वापरायचे आहे. अमोल मिटकरी यांनी काल ट्विट केले. त्यात शरद पवारांचा उल्लेख आहे. ग्रामीण भागातील मतदार ट्विटर वगैरे खरेच पाहतात का? ग्रामीण भागात दिल्लीतील घडामोडींचाही परिणाम होतो, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचा दोन्ही गटांना सल्ला
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना सुनावले. शरद पवार गटाच्या वकिलांच्या मागणीवर टिप्पणी करताना मतदारांवर आमचा परिणाम होईल, इतके मतदारांना कमी समजू नका. शरद पवार स्वत: अजित पवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत ना? असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. दुसरीकडे अजित पवार गटाला शरद पवारांची छबी न वापरता स्वतंत्रपणे लढण्याचे निर्देश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR