लातूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी मतदार व लोकशाहीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या अनोख्या निमंत्रण पत्रिकेने मतदारांचे लक्ष वेधले आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या लोकशाही यांचा बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजताच्या शुभ मुहूर्तावर विवाह संपन्न होत आहे. महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी तसेच उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा. यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर येण्याचे भारतीय लोक, कु. निळीशाई व चि. इव्हीएम यांनी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या निमंत्रण पत्रिकेची सोशल मीडियावर तसेच मतदारांमध्ये चर्चा होत आहे.
सोहळ्याच्या निमंत्रणाची पहिलीच वेळ
साधारणत: शासकीय किंवा घरगुती कार्यक्रमाप्रसंगी निमंत्रणपत्रिका छापून मान्यवर पाहुणे तसेच आप्त स्वकीय नातेवाइकांना पत्रिका देऊन कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. मात्र मतदारांनी आवर्जून मतदान करावे, यासाठी निमंत्रण देण्याची ही पहिलीच वेळ असावी.