शिर्डी : ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आज येथे सभा होत आहे, त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते.
आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मिळाले. आणि खरोखरच ही पवित्र भूमी असल्याची अनुभूती झाली. महाराष्ट्र सामाजिक क्रांतीची धरती आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची ही धरती असून येथे कणाकणात सत्य, समानता, मानवता आहे. महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली, असेही त्या म्हणाल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.१६) राहाता तालुक्यातील साकुरी येथील दौलतबाग येथे आयोजित विजय निर्धार सभेत त्या बोलत होत्या. श्री साईबाबांची मूर्ती देत काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी गांधी यांचा सत्कार केला.
व्यासपीठावर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी, तेलंगणा राज्याच्या मंत्री सीताक्का, आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड, युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, उद्धव सेनेचे रावसाहेब खेवरे, काँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते.
शिर्डी मतदारसंघातील दहशत मोडून काढण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. शिर्डी मतदारसंघात ‘दहशत से आझादी’ हवी आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना आवाहन केले होते की, कोणता मतदारसंघ चांगला आहे. याची चर्चा होऊन जाऊ द्या, त्यांनी ते आवाहन स्वीकारले नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे. ज्यांना विखेंना, भारतीय जनता पक्षाला, जातीयवादाला विरोध करायचा आहे त्यांनी शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना मतदान करावे, असे आवाहन आमदार थोरात यांनी करत लाडक्या बहिणींना महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे असे सांगितले.