मुंबई : प्रतिनिधी
भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबुतीच्या दिशेने वाटचाल करीत असून, भारताचा विकास दर सुसाट आहे. जुलै ते सप्टेंबर या दुस-या तिमाहीत आर्थिक विकास दर ७.६ टक्के इतका राहिला आहे. केंद्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान वित्तीय तुटीचा आकडा हा ८.०४ लाख कोटींवर पोहोचला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दुस-या तिमाहीत आर्थिक विकास दर हा ६.५ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर हा ७.८ टक्के इतका होता. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर ७.८ टक्के होता. दुस-या तिमाहीतही अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ झाली आहे. आर्थिक व्यवहार सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार दुस-या तिमाहीत विकास दराचे आकडे हे चांगले असणार असल्याचे सांगण्यात आले होते. अन्न अनुदानावरील खर्चात वाढ झाली असली तरी वित्तीय तूट ५.९ टक्के राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी चलनविषयक धोरण जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शहरी भागात मागणी वाढल्याने वापर वाढला आहे तर ग्रामीण भागातही मागणीत सुधारणा दिसून येत आहे. सेवा, ग्राहकमध्ये वाढ चांगली असून सरकारच्या भांडवली खर्चात वाढ झाल्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होत आहे, असे म्हटले होते.
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत वाढ
यंदाच्या तिमहीत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा आर्थिक विकास दर हा १३.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याच कालावधीत मागील वर्षी हा दर ३.८ टक्के होता तर पहिल्या तिमाहीत हा आकडा ४.७ टक्क्यांवर होता. दरम्यान गुरुवारी सरकारी आकडेवारीवरून असे दिसून आले की आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांचे उत्पादन ऑक्टोबर २०२३ मध्ये १२.१% वाढले होते. दरम्यान यंदाच्या तिमाही अनेक क्षेत्रांनी चांगली वाढ नोंदवली आहे.