पुणे : प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणावरून वादळ उठले असताना मागासवर्ग आयोगाची दुसरी बैठक आता उद्या, शुक्रवारी पुण्यात होणार आहे. केवळ मराठा समाजाचेच की मराठ्यांसह सर्व समाज घटकांचे सर्वेक्षण होणार याबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाची मागील आठवड्यात माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत मराठा समाजासह ओबीसी, व्हीजेएनटी समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. हे सर्वेक्षण आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजित आधारावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयोगाच्या काही सदस्यांनी बैठकीच्या दिवशी मराठ्यांसह सर्व समाज घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुस-याच दिवशी आयोगाचे दुसरे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जाहीर करीत अन्य समाजाबाबत चर्चा झाली. त्याबाबत ठराव झाला नसल्याचे सांगितले.
त्यावरून आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभेद आहेत की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्याशिवाय आयोगाच्या बैठकीतील माहिती बाहेर माध्यमांना देऊ नये, असे सांगत आयोगाने नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उद्या सर्वेक्षणावर काय निर्णय होणार, याकडे लक्ष असणार आहे.
सर्वेक्षणावरून मतभेद
काही सदस्यांच्या मते बिहारच्या धर्तीवर सर्व समाजाचे सर्वेक्षण केल्यास त्याचा तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जाऊ शकते. तसेच नवा संवर्ग निर्माण करणे सोपे ठरेल. तसे झाल्यास आयोगाच्या बैठकीत ठराव करून तो राज्य सरकारकडे पाठवावा लागेल. त्यामुळे आयोगाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, यावर सर्वेक्षणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.