जालना : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली. यात एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावरही टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.
मनोज जरांगे यांनी आम्ही मैदानात नव्हतो, तुम्हाला जरांगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल. आयुष्य गेले तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही. मर्दासारखे बोलायचे, आपण ज्याच्या सभा घेतल्या, तो निवडून आला पाहिजे. मराठ्यांचे दीडशे होते. आता २०४ झाले. मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. काहींना कुत्र्याचे कातडे पांघरून वाघ झाल्यासारखे वाटते. मी मराठा बंधनमुक्त केला होता.
राजकारणाच्या दहशतीपासून मी मराठा समाजमुक्त केला, अशी टीका त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली. मी समाजाला सांगितले होते, ज्याला निवडून आणायचे, ज्याला पाडायचे त्याला पाडा. आमच्या मागण्या मान्य करायच्या नाही तर सामूहिक उपोषण होणार, असा इशाराही त्यांनी दिला. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचे नाही. राज्यात अर्धी गावे आमची आहेत.
आमच्याशी बेईमानी करायची नाही. मराठ्यांना खेळवायचे आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. आरक्षण दिले नाही तर सोडणार नाही. पुन्हा आले की मी पुन्हा उपोषणाला बसणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.