लातूर : प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाने जादा बसेसच्या वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार लातूर विभागाने दि. २५ ऑक्टोबर ते दि. १५ नोव्हेंबर या कालावधीसाठी दैनंदीन जादा फे-यांचे नियोजन केले होतो. दिवाळीच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या एसटी महामंडळाने सवलतीसह २३ कोटी ४० लाख ७३ हजार रूपयांचे उत्पन्न कमावले आहे. त्यामुळे यावर्षी लातूर विभागाला दिवाळी भरभरून पावली आहे.
जिल्हयातील लातूर, उदगीर, अहमदपुर, निलंगा व औसा बसस्थानकातून या जादा फे-या सोडण्यात आल्या. दिवाळीच्या कालावधीत जादा फे-यातुन प्रवाशांची सुरक्षित सेवा पार पाडुन कोणत्याही परिस्थितीत जास्तीत-जास्त प्रवाशी चढ-उतार करुन फायदयात चालल्या पाहिजेत. या बाबतची दक्षता घेणे बाबत सर्व आगारांना सुचना देण्यात आलेल्या होत्या.
एसटी महामंडळाच्या लातूर विभागाने लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर आगारातून दिवाळी निमित्त जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. दिवाळी गर्दीच्या हंगामात पुणे, सोलापूर, नांदेड, माजलगाव छत्रपती संभाजी नगर या मध्यम व लांब पल्याच्या ज्यादा फे-या चालविण्यात आल्या. उदगीर-भिवंडी व उदगीर-बोरिवली या नवीन फे-या सुरू केल्या. जिल्ह्यांतर्गत शटल सेवांच्या फे-या वाढविण्यात आल्या. त्यांचा प्रचंड प्रतिसाद लातूर विभागाला मिळाला आहे.