केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सायबर गुन्हेगार गेल्या काही दिवसांपासून नवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. याविषयी कल्पना नसल्यामुळे आतापर्यंत अनेक जण या फसवणुकीला बळी पडले आहेत. सायबर गुन्हेगार कायदा आणि नियमांची भीती दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. यालाच ‘डिजिटल अरेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. याच्या वाढत्या प्रकरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’मध्ये ‘डिजीटल अरेस्ट’बद्दल नागरिकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला होता. गंभीर बाब म्हणजे २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारताला सायबर फसवणुकींमुळे अंदाजे ११,३३३ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर या गृह मंत्रालयाच्या विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये झालेल्या फसवणुकीचा आकडा सर्वाधिक असून अशा फसणुकींमध्ये ४,६३६ कोटी रुपयांचे नुकसान झाले, ज्यासंबंधी २,२८,०९४ तक्रारी मिळाल्या होत्या तर गुंतवणुकीसंबंधी फसवणुकीच्या १,००,३६० तक्रारीमधून ३,२१६ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच ‘डिजीटल अरेस्ट’ संबंधित ६३,४८१ तक्रारींमधून १,६१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.