नवी दिल्ली : दिल्ली ही जगातील सर्वांत असुरक्षित राजधानी असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी एक नकाशा दाखविला. ज्यामध्ये अमित शाहांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर परिसरात अलीकडच्या काळात किती गुन्हेगारी घटना घडल्या आहेत हे नकाशाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला.
आज मला जड अंत:करणाने ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुंबईसारखे गँगवार दिसत आहे. आज दिल्ली ही जगातील सर्वांत असुरक्षित राजधानी आहे. गेल्या तीन महिन्यांत यमुनेच्या पलीकडे झालेल्या गँगवॉरमध्ये २० जणांना आपला जीव गमवावा लागला, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, दहा वर्षांपूर्वी मला एक जिम्मेदारी मिळाली. त्यावेळी शाळा, वीज, आरोग्य, पाणी या सर्व गोष्टी मी व्यवस्थित केल्या. पाण्याची स्थिती सुधारत आहे. मात्र, दिल्लीतील सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
अमित शहांनी जबाबदारी स्वीकारावी
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अमित शाह यांची आहे. अमित शाह दहा वर्षात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरले आहेत. दिल्लीला रेप कॅपिटल, गँगस्टर कॅपिटल म्हटले जात आहे. आज महिला आणि व्यावसायिक सर्वाधिक घाबरले आहेत असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, काल मी एका व्यावसायिकाला भेटायला नांगलोईला गेलो होतो, ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मी फक्त भेटायला गेलो होतो, पण भाजपचे खासदार आपल्या लोकांसह तिथे पोहोचले आणि मला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, मला रोखून काही होणार नाही.