देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असतानाच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळसदृश वा-यांची निर्मिती होत आहे. उत्तरेकडून हिमालय क्षेत्राच्या दिशेने येणा-या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे कोरड्या वा-यांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट लागू राहणार असून उर्वरित राज्यातही त्याचे परिणाम दिसून येतील. राज्यात फक्त उत्तर आणि मध्य क्षेत्रच थंडीने व्यापले आहे असे नाही, अनेक जिल्ह्यांतील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर धुक्याची चादर असून सूर्य डोक्यावर आलेला असतानाही हवेतील गारठा मात्र कायम आहे.
दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल प्रदेश आणि पूर्वाेत्तर राज्यातही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. जम्मू- काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप सुरू असून खो-यामध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. एकंदरीत देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधील गारठा थेट महाराष्ट्रावर परिणाम करत असल्याने थंडीची ही लाट लवकर पाठ सोडेल असे वाटत नाही. पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक राहणार असल्याने या काळात घराबाहेर पडणा-यांनी विशेष काळजी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते. हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने या वादळाचा परिणाम राज्यावर होणार असून थंडी वाढणार आहे.
२८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पारा घसरला आहे. पुण्यातील तापमान एक ते दीड अंशाने कमी झाले आहे. उत्तरेकडील थंड वा-याच्या प्रवाहामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याचा पारा घसरला आहे. किमान तापमान प्रथमच आठ अंशावर पोहोचले आहे. जालना, परभणी येथे हुडहुुडी वाढली आहे. हुडहुडी वाढल्याने जनजीवन गारठले असून जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. शहरात गारठा कमी असला तरी ग्रामीण भागात शेतीमालाला पाणी सुरू असल्याने पैठण धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या गावांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठामध्ये यंदाच्या हंगामातील ८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशापेक्षा खाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली आला आहे. मराठवाड्यात किमान तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणा-या थंड वा-यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. बुधवारी नगरमध्ये सर्वांत कमी ९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. सध्या पहाटे धुके पडत असून दिवसभर हवामान कोरडे राहत आहे. रात्रीपासून थंड वारे वाहत आहेत शिवाय आता दिवसादेखील थंडी जाणवत आहे. पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होते. हवामान विभागाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला होता. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा जास्त वाढला आहे. तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. काही जिल्ह्यांत तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. राज्यात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. डिसेंबर महिन्यात थंडी वाढणार असून त्यापासून बचाव करण्यासाठी स्वेटर, गरम कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानात आणखी ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक, फळबागा, भाजीपाला व फुलपिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे लागेल. मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा १० ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत थंडी असते, त्यानंतर सायंकाळी ४ पासून थंडीला पुन्हा सुरुवात होते, असे सध्याचे चित्र आहे. तसा दिवसभरच गारठा असतो पण रात्री पडणारी थंडी अतिशय तीव्र आणि बोचरी आहे. त्यामुळे सगळीकडे शेकोट्या पेटलेल्या दिसतात. कडाक्याच्या थंडीने गारठून जाण्याची वेळ आल्याने अबाल-वृध्दांपासून सारेच हैराण आहेत. सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा पाऊसमान जास्त झाल्याने थंडीची तीव्रता आणखी वाढेल, असे म्हटले जात आहे. सारेजण थंडीची लाट कधी कमी होईल याची वाट पाहात असले तरी शेतकरीवर्ग मात्र या लाटेमुळे आनंदीत झाला आहे.
कारण रबी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना जेवढी जास्त थंडी तेवढी ती अधिक जोमाने वाढतात. थंडीमुळे गव्हावर तांबेरा, करपा, भुरकट्या रोग पडत नाही. हरभरा पिकावर मर रोग अळीचा प्रादुर्भाव होत नाही. थंडी आणखी महिनाभर राहिली तर रबी पिकांसाठी ते वरदानच ठरणार आहे. सध्या ब-याच ठिकाणी ज्वारी जोमात आहे. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जमिनीतला ओलावा टिकविणे गरजेचे आहे. तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. काही ठिकाणी तुरीला फुले आली आहेत तर काही ठिकाणी शेंगा भरण्यास सुरुवात झाली आहे. या अवस्थेत घाटेअळी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी शेतक-यांना औषधांची फवारणी प्रामुख्याने करावी लागणार आहे. हिवाळ्याच्या हंगामात योग्य काळजी घेतल्यास ज्वारी, हरभरा आणि तुरीचे चांगले उत्पादन बळिराजाला होऊ शकते, त्याचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते.