निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील आज दि २९ नोव्हेंबर रोजी किमान तापमान ९ अंश सेल्सिअस वर आल्याने औरादसह परिसर थंडीने गारठला आहे. थंडीचा गारठा पसरल्याने नागरिकांच्या अंगात हुडहुडी भरली जात आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढली आहे. यामुळे या शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये अती उष्णतेचा तर हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीचा चटके बसतात. गत पाच दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने नागरिकांना थंडीची हुडहुड भरत आहे. यात दि. २५ ते २७ नोव्हेंबर तीन दिवस किमान तापमान किमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल २९ अंश सेल्सिअस , दि . २८ नोव्हेंबर रोजी किमान १० अंश सेल्सिअस तर कमाल २८ अंश सेल्सिअस व दि. २९ नोव्हेंबर रोजी कमाल २९ अंश सेल्सिअस व किमान ९ अंश सेल्सिअस असा दिवसेंदिवस किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने कडाक्याच्या थंडीने हुडहुडी भरली जात आहे.
यामुळे नागरिकांचा ओढा गर्मीचे वस्त्र परिधान करत आहेत. औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर आज दि. २९ नोव्हेंबर रोजी ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले.