अहमदाबाद : अहमदाबादमध्ये डुप्लिकेट भारतीय नोटा बनवण्याचे अनेक रॅकेट उघडकीस आले आहे. डुप्लिकेट परकीय चलन छापण्याचा घोटाळा पहिल्यांदाच उघडकीस आला आहे. येथे एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्या एका मित्राच्या मदतीने बनावट डॉलर छापण्यास सुरुवात केली. मात्र, बनावट डॉलर बाजारात विकण्याआधीच एसओजीने आरोपीला अटक करून बनावट कारखान्याचा पर्दाफाश केला. या कलर प्रिटिंग मशीनचा वापर करून ऑस्ट्रेलियन डॉलर्स छापले जात होते.
वेजलपूर येथील जलतरंग बसस्थानकाजवळील लाईफ स्टाईल हेअर कटिंगच्या दुकानात रौनक राठोड नावाचा तरुण केस कापण्यासाठी आला होता. केस कापताना त्याने दुकानमालक राकेश परमार यांना सांगितले की, आपल्याकडे ६ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स असून भारतीय चलनानुसार एका ऑस्ट्रेलियन डॉलरची किंमत ५५ रुपये आहे. जर तुम्हाला डॉलर घ्यायचे असतील तर तुम्हाला एक डॉलर ४० रुपयांना मिळू शकेल. राकेशला रौनकचा संशय आला आणि त्याने रौनकला डॉलर आणायला सांगितले. राकेशने हा प्रकार त्याच्या मित्राला सांगितला आणि त्याच्या मित्राने सर्व प्रकार एसओजीला सांगितला.
एसओजी टीम तात्काळ हेअर सलूनमध्ये पोहोचली आणि रौनकची वाट पाहू लागली. काही वेळाने रौनक तेथे पोहोचला आणि एसओजीने त्याला ऑस्ट्रेलियन डॉलरसह अटक केली. ताब्यात घेतल्यानंतर रौनकची चौकशी केली असता त्याने आपला मित्र खुश पटेल याच्याकडे एक लाख ऑस्ट्रेलियन डॉलर असल्याचे सांगितले.