सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटप गैरप्रकारात ३५ जणांवर २३८ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्या रकमेच्या वसुलीसाठी सोमवारी नोटीस निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकबाकीदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटपात गैरप्रकार झाला आहे. त्याची जबाबदारी माजी संचालक मंडळासह बँकेच्या अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजीमंत्री दिलीप सोपल, (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी आ. राजन पाटील, जयवंतराव जगताप, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, दीपक साळुंखे-पाटील, बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, रश्मी बागल, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, चंद्रकांत देशमुख, (कै.) सुधाकर परिचारक यांच्यासह ३५ जणांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्या सर्वांना पुढील आठवड्यात रक्कम वसूल करण्यासाठी नोटिसा येणार आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटपात झालेल्या गैरप्रकाराबद्दल बँकेच्या वतीने कलम ८८ नुसार सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीनुसार सुनावणी प्रमुख किशोर तोष्णीवाल यांनी गैरप्रकारातील माजी संचालक मंडळ, अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार त्या सर्वांकडून जबाबदारी निश्चित केलेली रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
जबाबदारी निश्चित केलेल्यांमध्ये प्रमुख नेत्यांसह संपतराव पाटील, चंगोजीराव पाटील, रामचंद्र वाघमोडे, बबनराव आवताडे, अरुण कापसे, संजय कांबळे, बहिरू वाघमोडे, सुनील सातपुते, रामदास हक्के, चांगदेव अभिवंत, बद्रिनाथ अभंग, विद्या बाबर, सुनंदा बाबर, नलिनी चंदेले, सुरेखा ताटे, सुनिता बागल, किसन मोटे, काशिलिंग पाटील, संजीव कोठाडिया यांचा समावेश आहे.