लातूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या वतीने प्रतिबंधित करण्यात आलेल्या कॅरीबॅग जप्त करण्याची मोहीम मनपाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून राबविण्यात येत आहे. या तीन दिवसात ७८ किलो कॅरीबॅग जप्त करून संबंधितांकडून ७१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा अधिसूचना २०२१ मध्ये जारी केली आहे. त्यानुसार १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे.असे प्लास्टिक वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले तर दंड करण्याची तरतूदही त्यात आहे. शहरात १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्या जात असल्याचे लक्षात आल्याने मनपाने प्लास्टिक जप्ती मोहीम सुरु केली आहे. स्वच्छता विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिलेल्या आदेशान्वयेमंगळवार दि. २६ नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू आहे. मंगळवारी शहरातील चारही झोन मधून ३७ किलो ५०० ग्रॅम कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. संबंधितांना कॅरीबॅग जप्त केल्यानंतर २७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. बुधवार दि. २७ रोजी या मोहिमेंतर्गत २१ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.संबंधितांकडून २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गुरुवारी २० किलो कॅरीबॅग जप्त करत २० हजार ९०० रुपये दंड घेण्यात आला.
मनपाने प्लास्टिक कॅरीबॅग जप्तीची मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचे कळविले आहे. संबंधितांनी प्लास्टिक कॅरीबॅग ऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा. आपल्याकडील कॅरीबॅग मनपाकडे जमा करून सहकार्य करावे, होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांनी केले आहे.