मुंबई : प्रतिनिधी
महायुतीकडून सत्तास्थापनेची जोरदार तयारी सुरू झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ््यासाठी उपस्थित असणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, या नावाची अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. त्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे फडणवीस यांनाच पुन्हा संधी मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु भाजपने अद्याप गटनेतेपदाची निवड केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता कायम आहे. त्यातच गृहमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असून, त्यावरून महायुतीत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. यावर तोडगा निघाल्यास महायुतीची बैठक होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी आझाद मैदानावर शपथविधी सोहळा रंगणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री कोण होणार, विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत महायुतीच्या नेत्यांची बैठक होत नाही, तोपर्यंत याबाबत निर्णयाची प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत शपथविधी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा होणार का, आणखी काही मंत्र्यांचा होणार, हे ठरविले जाऊ शकते. मात्र, या बैठकीबाबतही अनिश्चितता आहे.
एकीकडे शिंदे गटाचे नेते गृहमंत्रिपदाच्या मुद्यावरून आग्रही आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेही सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत आहेत. परंतु महायुतीच्या नेत्यांची बैठक कधी होणार, याबद्दल काहीही बोलत नाहीत. त्यामुळे मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपदावरूनही अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे.
महायुतीचा सर्वात मोठा घटक असलेल्या भाजपने अद्याप आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याचे नाव जाहीर केलेले नाही. अजित पवार यांनी शनिवारी सांगितले की, मुख्यमंत्री भाजपचा असेल तर उपमुख्यमंत्री दोन्ही मित्रपक्षांचे असतील.
शपथविधी अगोदर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपाची ही महत्वपूर्ण बैठक ३ किंवा ४ तारेखला होऊ शकते. आता भाजपाच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही नाराज असल्याचे बोलले जात आहे. ते आपल्या मागण्या पुढे रेटत असल्याचे समजते. तसेच ते उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारण्यास अजूनही तयार नसल्याचेच बोलले जात आहे. त्यामुळे आता त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. परंतु राज्यातील स्थिती पाहता ते श्रीकांत शिंदे यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
रा. स्व. संघात नाराजी
निकालाला आठवडा उलटला तरीही अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. सत्ताधा-यांना अद्याप मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवता आलेला नाही. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत, यासाठी संघ आग्रही आहे. पण भाजपने फडणवीस यांचे नाव अद्यापपर्यंत जाहीर केलेले नाही. दुसरीकडे भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
शिंदे ठाण्यात दाखल
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातील गावातून ठाण्यात परतले आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जनतेने आम्हाला बहुमत दिल्याने लवकरच लोकहिताचे सरकार स्थापन होईल, असे सांगितले. त्यासाठी लवकरच महायुतीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व काही ठरेल आणि त्यानंतर सरकार स्थापन होईल, असे सांगितले. परंतु ही बैठक कधी होणार, याबाबत वाच्यता केलेली नाही.