21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द

एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द

डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

मुंबई : प्रतिनिधी
नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा तोंडावर आलेला असताना सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेंकडून आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्­यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदाना पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. त्याउलट एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद या दोन्हीही पदांवर ठाम आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत मोठा तिढा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या आज होणा-या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते विश्रांती घेत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदे दरेगावात मुक्कामी
दरम्यान शनिवार आणि रविवार असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे साता-यातील दरे गावात मुक्कामी होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते विश्रांतीसाठी गावी गेले होते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ते दरे गावात होते. यानंतर काल संध्याकाळी ते मुंबईत परतले. यानंतर आज एकनाथ शिंदे अनेक बैठकांना हजेरी लावतील असे सांगितले जात होते. मात्र सध्या एकनाथ शिंदेंची प्रकृती ठिक नसल्याने ते विश्रांती घेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR