ढाका : बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.
या अहवालानुसार, शेख हसीना पंतप्रधान असताना दरवर्षी सुमारे १६ अब्ज डॉलर्सची चोरी झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल सादर करणारी समिती अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी स्थापन केली होती. त्यामुळे आता शेख हसीना यांच्याविरोधात आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.
शेख हसीना यांच्या भ्रष्ट हुकूमशाही दरम्यान बांगलादेशातून दरवर्षी सरासरी १६ अब्ज डॉलर्स बेकायदेशीरपणे बाहेर काढले जात होते असा धक्कादायक धावा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केला आहे. या अहवालानुसार, शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत देशात दरवर्षी सरासरी १६ अब्ज डॉलर्सची चोरी झाली आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेची कशी लूट केली हे कळल्यानंतर आमचे रक्त उकळत आहे.
समस्या आपल्या समजण्यापेक्षा खोल
दु:खाची गोष्ट ही आहे की त्यांनी उघडपणे लूट केली आणि आपल्यापैकी बहुतेकांना त्याचा सामना करण्याचे धाडसही झाले नाही. अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे हे या दस्तऐवजावरून दिसून येते अशी प्रतिक्रिया मोहम्मद युनूस यांनी दिली आहे. तसेच ही समस्या आपल्या समजण्यापेक्षा खोल असल्याचेही समितीने म्हटले आहे.