ठाणे : प्रतिनिधी
दरेगाववरून दोन दिवसांत एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही. आता ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. परंतु महायुतीचे नेते आणि हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत. त्यांची प्रकृती अजूनही बरी नाही. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पांढ-या पेशी कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. सतत येत असणा-या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीला होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबईला परत न येता थेट साता-यातील आपल्या दरेगावी गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरेगावात ते आजारी असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.